पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने पुणे-करीमनगर- पुणे फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, १८ डबे असलेल्या या विशेष ट्रेनच्या ८ फेऱ्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, किनवट, आदिलाबाद मार्गाने असा गाडीचा प्रवास राहील.
पुणे-करीमनगर या साप्ताहिक विशेष ट्रेनच्या ४ फेऱ्या राहतील. गाडी क्रमांक (०१४५१) पुणे-करीमनगर स्पेशल ट्रेन २१ आणि २८ ऑक्टोबर रोजी आणि ४ व ११ नोव्हेंबरला प्रत्येक सोमवारी पुणे स्थानकावरून रात्री १०.४५ मिनिटांनी सुटेल. दौंड, अहमदनगर, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, मार्गे करीमनगर येथे बुधवारी पहाटे २ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे २३, ३० ऑक्टोबर आणि ६ व १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरून सकाळी सहाला सुटेल. पुण्याला गुरुवारी सकाळी ९.४५ मिनिटांनी पोहोचेल.