छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाइड नोट लिहिल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओही पोस्ट केला… त्यानंतर २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) सकाळी ११ वाजता सुंदरवाडीतील केंब्रीज शाळा परिसरात समोर आली.
गोरखनाथ जगनाथ फुके (रा. कुंभारी, ता. भोकरदन, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो तीन महिन्यांपासून सुंदरवाडी परिसरात लॉज व्यवसाय करणाऱ्या मित्राकडे राहण्यासाठी आला होता. मित्राच्या घराचे बांधकाम केंब्रीज शाळेच्या परिसरात सुरू आहे. गोरखनाथ तिथेच राहून देखरेख करत होता. गुरुवारी मध्यरात्री १२:३० वाजता त्याने सोशल मीडियावर ४० सेकंदांचा व्हिडीओ टाकला. त्याआधी सुसाईड नोट लिहिली. त्याला त्रास देणाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करून त्रासाला कंटाळून फाशी घेत असल्याचे सांगत आत्महत्या केली. गोरखनाथला त्याच्या मित्राने व साईटवरील मजुरांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद चिकलठाणा पोलिसांनी केली आहे.