छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीतील लिभेर या आंतरराष्ट्रीय कंपनीतील १५ कामगारांना जेवणातील रसगुल्ल्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी घडली. बाधित कामगारांना तातडीने कंपनीजवळीलच आदर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना उपचारानंतर घरीही पाठविण्यात आले, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लिभेर कंपनीत इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्मिती केली जाते. दुपारच्या शिफ्टमधील कामगार सायंकाळी सहाच्या सुमारास कँटीनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. काहींनी डबादेखील आणला होता. रसगुल्ला खाल्ल्यानंतर काहींना मळमळ, तर काहींना उलट्या होणे सुरू झाले. एकाच वेळी १५ कामगारांना त्रास सुरू झाल्याने त्यांना तत्काळ जवळील आदर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. आर. बी. पाटील यांनी पत्रकारांना दिली.