छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : गेले १० दिवस गणपती बाप्पाची आराधना केल्यानंतर, या चैतन्यमयी गणेशोत्सव सोहळ्याची आज, १७ सप्टेंबरला मूर्ती विसर्जनाने सांगता होणार आहे. गणेशोत्सव मंडळे मिरवणूक काढून गणरायाला निरोप देणार आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढील वर्षी लवकर या, अशी विनवणी केली जाणार आहे. मुख्य मिरवणूक मार्गातील १४ तर सिडको हडको व गजानन महाराज मंदिर मार्गावरील ५ रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी दिवसभर बंद राहणार आहेत. मुख्य मिरवणूक राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथून, गारखेड्यातील मिरवणूक गजानन मंदिर चौकातून तर सिडको-हडकोतील मिरवणूक आविष्कार कॉलनी चौकातून निघणार आहे. छावणी गणेश महासंघाची श्री मूर्ती विसर्जन मिरवणूक बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता निघणार आहे.
पोलीस दक्ष, सकाळी सातपासूनच लागलाय बंदोबस्त…
बाप्पाला उत्साहात निरोप देण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. सकाळी सातपासूनच तब्बल ४ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मध्यरात्री १ वाजेपर्यंत हा बंदोबस्त कायम असेल. ७२ संवेदनशील ठिकाणी रात्रीपासूनच पोलीस तैनात झाले असून, ४ उपायुक्तांसह ७ सहायक पोलीस आयुक्त, ४५ पोलीस निरीक्षक, १४० सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक, ३ हजार पोली अंमलदार, ५०० होमगार्ड, २७४ वाहतूक पोलीस अंमलदार, एसआरपीएफचे ७१ शस्त्रधारी जवान, शहर पोलीस दलाच्या दंगाकाबू पथकाचे २ उपनिरीक्षक व १११ जवान तैनात असतील. विविध भागांत २० तासांपेक्षा अधिक काळ गस्त असेल. २१ अतिसंवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट आहेत. याची १६ अधिकारी, ८४ अंमलदारांवर जबाबदारी दिलेली आहे. ड्रोनद्वारे मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ८ पथके नियुक्त केली आहेत. गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. लेझर शोवर बंदी घातली आहे. डीजेचा आवाजही ५५ डेसिबलपर्यंत ठेवावा लागणार आहे. पोलीस ठिकठिकाणी रीडिंग घेणार आहेत. नियमांचा भंग केल्यास आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
आकडे बोलतात….
७ मुख्य मिरवणुका निघणार.
३० बेड घाटी रुग्णालयात राखीव
१००० सार्वजनिक गणेश मंडळे
७११ नोंदणीकृत मंडळे
१.१० लाख घरगुती गणपती
२७० डीजेंचे बुकींग
आज सकाळी ७ पासून ते श्री गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक संपेपर्यंत हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील…
१) मुख्य मिरवणुकीचा मार्ग संस्थान गणपती ते गांधीपुतळा, सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.
२) संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधीपुतळा, सिटीचौक, जुनाबाजारमार्गे भडकलगेट.
३) जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.
४) निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
५) भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन.
६) चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधीपुतळा.
७) लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
८) कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केटमार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.
९) सिटीचौक पोलीस स्टेशन पश्चिमेकडील बुऱ्हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
१०) बुढीलाईन, जुने तहसील कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
११) सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.
१२) सावरकर चौक, एम.पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा / बळवंत वाचनालय चौक.
१३) अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
१४) रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.
यासाठी पर्यायी मार्ग…
१) रोशनगेटकडून शहागंजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, सिटी चौकमागील रोडने वाहतूक चालू राहील.
२) मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली टॉकीजजवळून उजवीकडे नागेश्वरवाडी डॉ. खनाळे हॉस्पिटल, निराला बाजार, समर्थनगरमार्गे तसेच अंजली टॉकीजपासून डावीकडे खडकेश्वर म.न.पा. मार्गे जातील.
३) क्रांतीचौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौकमार्गे बसस्थानकाकडे जातील.
नवीन छत्रपती संभाजीनगर सिडको हडको, गजानन महाराज मंदिर विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग…
१. चिश्तीया चौक-आविष्कार चौक बजरंग चौक ते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशनसमोर एन-७ बसस्टॉप पार्श्वनाथ चौक एन-९ एम-२ एन-११-जिजाऊ चौक टी.व्ही. सेंटर चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेलजवळील विहीरपर्यंत. तसेच जिजाऊ चौक ते शरद टी.
२. चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी. व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.
३. एन १ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिश्तीया चौक ते व्दारकादास शामकुमार साडी सेंटर.
४. आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँक.
५. सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर, पटीयाला बँक ते गजानन महाराज मंदिर.
यासाठी पर्यायी मार्ग….
१) सेंट्रल नाका व चिश्तिया चौकाकडून एन-१ चौक व टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहने ही मणियार चौक, व्दारकादास शामकुमार साडी सेंटर, जीएसटी कार्यालय, व्हीआयपी मराठा हॉटेल, एसबीआय बँक मार्गे किंवा सेव्हनहील, हायकोर्ट सिग्नल, जळगाव टी पॉईंट, एन-१ चौक, वोखार्ड टी, आंबेडकर चौक, शरद टी, हर्सूल टी, जटवाडा टी, हडको कॉर्नरमार्गे जातील व येतील.
२) जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश कॉलनीमार्गे टी. व्ही. सेंटरकडे जाणारी वाहतूक उद्धवराव पाटील चौक, हडको कॉर्नर मार्गे जातील व येतील.
३) पटीयाला बँक ते गजानन महाराज मंदिर चौककडे येणारी वाहने, हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉलमार्गे जातील व येतील.
४) जवाहरनगर पो. स्टे. ते गजानन महाराज मंदिरकडे येणारी वाहने, माणिक हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल पाठीमागील रोडने त्रिमूर्ती चौकाकडे जातील व येतील.
५) त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिरकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमागील रोड, माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पो.स्टे. मार्गे जातील व येतील.
६) सेव्हन हील उड्डाणपूलकडून गजानन महाराज मंदिरकडे येणारी वाहने जालना रोडने आकाशवाणी मार्गे जातील.
(ही अधिसूचना अत्यावश्यक सेवा उदा. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, गणपती विसर्जन मिरवणुकीत सामिल होणारी देखाव्याची व तत्सम अत्यावश्यक वाहनांना लागू असणार नाही, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी कळवले आहे.)
सिडको व्यापारी महासंघातर्फे पुरी-भाजी
सिडको व्यापारी महासंघातर्फे ढोल- ताशा पथकांना व मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांना पुरी-भाजी वाटपाची परंपरा यंदाही कायम असून, आविष्कार कॉलनी चौकात पुरी-भाजी वाटप केली जाईल. यंदा ६ क्विंटल पुरी-भाजी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी रात्रीपासूनच भट्टी पेटविण्यात आल्या. रात्री पुरी-भाजी तयार करून त्याचे पॅकिंग करण्यात आले.
अशा निघतील मिरवणुकी…
-जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीची मिरवणूक संस्थान गणपती मंदिर चौकातून स. ११ वा. निघेल.
-नवीन औरंगाबाद गणेश महासंघाची मिरवणूक गजानन मंदिर चौकातून दु. १२ वा. निघेल.
-सिडको-हडको गणेश महासंघाची मिरवणूक अविष्कार कॉलनी चौकातून दु. ३ वा. निघेल.