छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आधी स्कुटीस्वार मुलीला धडक देऊन पाडले. त्यानंतर तिलाच तुझी चूक म्हणून दमदाटी सुरू केली. हे पाहून त्यांची समजूत काढणाऱ्या नागरिकाला तिघांनी शिवीगाळ मारहाण केली. एकाने चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
सोमनाथ गंगाधरराव बोंबले (वय ४८, रा. गुरुसहानीनगर, सिडको एन ४) असे जखमी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी दीपक बालाजी वाघमारे, सौरभ संतोष भालेराव, स्वप्नील सतीश कांबळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हायकोर्टाकडून एक मुलगी स्कुटीने कामगार चौकाकडे येत होती. तिला कामगार चौकाकडून येणाऱ्या स्कुटीची धडक बसली. यात मुलगी पडली. त्यानंतर दुसऱ्या स्कुटीवरील तिघांनी मुलीची चूक म्हणून तिला दमदाटी करायला सुरुवात केली. त्याचवेळी तिथून जाणारे सोमनाथ बोंबले थांबले आणि त्यांनी त्या मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तू कशाला मध्ये पडतो असे म्हणत बोंबले यांनाच शिवीगाळ व मारहाण सुरू केली. एकाने चाकूचे बोंबले यांच्या हातावर केले. यात बोंबले जखमी झाले. हा सर्व गोंधळ सुरू असताना नागरिक जमले, पोलीसही आले. त्यांनी तिन्ही मुलांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष साबळे करत आहेत.