छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ या कौशल्य विकास केंद्रांची स्थापन करण्यात येत आहे. या कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन शुक्रवारी (२० सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे यांनी दिली आहे.
३३ महाविद्यालयांमध्ये मिळणार प्रशिक्षण
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजने अंतर्गत जिल्ह्यातील ३३ महाविद्यालये निवडण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सिपेट, इंडो जर्मन टूल रूम, श्री आसारामजी भांडवलदार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवगाव रंगारी, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक व रोटेगाव, वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, मौलाना आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी, मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, शिवछत्रपती कॉलेज, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक / इंजिनीअरिंग, आयुर्वेद व ॲग्रिकल्चर महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, एमजीएम विद्यापीठाचे मॅनेजमेंट अँड रिसर्च, फार्मास्युटिकल सायन्स, फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालय, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे कृषी, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी महाविद्यालय, वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेज, साई आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था, आसावा ब्रदर्स बिझनेस स्कूल कला विज्ञान आणि वाणिज्य या ३३ महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे.
४० अभ्यासक्रमांचा समावेश
या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील हायड्रोफोनिक टेक्निशियन, किसान ड्रोन ऑपरेटर, ऑटोमोटीव्ह क्षेत्रातील इलेक्ट्रिक व्हेईकल संबंधी अभ्यासक्रम, जीएसटी असिस्टंट, सोलार पॅनल टेक्निशियन, हेल्थकेअर क्षेत्रातील जनरल ड्यूटी असिस्टंट, आयटी क्षेत्रातील वेब डेवलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिक्युरिटी गार्ड, अकाऊंट असिस्टंट आणि इलेक्ट्रिशियन आदी एकूण ४० अभ्यासक्रमांमध्ये रोजगार, स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमध्ये मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी संबंधित महविद्यालयांमध्ये रोजगार, स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपला प्रवेश नोंदवावा आणि २० सप्टेंबरला नजिकच्या महविद्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे यांनी केले आहे.