छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज, १४ सप्टेंबरला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करून अहवाल द्यावा, असे निर्देशही दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना, चेतन गिरासे, संतोष गोरड, उमाकांत पारधी, प्रवीण फुलारी तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे लतिफ पठाण व अरुण जऱ्हाड व तहसीलदार, पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मागणीनुसार पोलीस सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती करणे, पोलीस बंदोबस्त नियोजन करणे, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्र, साहित्य वाटप व स्विकृती केंद्र अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाचा पोलीस बंदोबस्त, संवेदनशील व जोखमीच्या मतदान केंद्रांबाबत पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, निवडणूक विषयक गुन्ह्यांची स्थिती, आचारसंहिता विषयक गुन्ह्यांची स्थिती, परवानाधारकांचे शस्त्र जमा करणे, गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेली रोकड जप्ती, अंमली पदार्थ, मद्यविषयक जप्ती कारवाई. समाजकंटकांविरुद्ध करावयाची प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात गणेश विसर्जन व ईद मिरवणुकांबाबतही महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वय राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.