पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथून दोन १४ वर्षीय मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघी नववीत शिकत होत्या. त्यातील एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पैठण एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
१० सप्टेंबरला रात्री ११ वाजता आईच्या शेजारी मुली झोपल्या होत्या. रात्री एकला लघुशंकेसाठी महिला उठली असता शेजारी झालेली मुलगी गायब होती. घराचा दरवाजा उघडा दिसला. महिलेने पतीला झोपेतून उठवून ही बाब सांगितल्यावर त्यांनी शोध सुरू केला. मुलीला शोधत असताना कळले, की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची पुतणीही गायब झालेली आहे. ग्रामस्थांनी दोघींचा गावात व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र मिळून आल्या नाहीत. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे करत आहेत.
१६ वर्षांची मुलगी एका मुलाच्या दुचाकीवर बसून गेली…
कन्नड तालुक्यातील पारसवाडीतांडा औराळा येथून १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी ११ सप्टेंबरला देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फूस लावून पळविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास मुलीचे वडील गव्हाचे पीठ आणण्यासाठी औराळा येथे किराणा दुकानात गेले होते. अर्ध्या तासाने परतले असता मुलगी घरात नव्हती. बाजूला राहणाऱ्या महिलेने सांगितले, की एक मुलगा तुमच्या घरी आला होता. त्याच्यासोबत मोटारसायकलीवर बसून मुलगी गेली. नातेवाइकांकडेही मुलगी गेली नव्हती. अखेर पोलिसंात तक्रार करण्यात आली. मुलगी दहावीत शिकत होती. तपास पोलीस निरीक्षक संदीप राजपूत करत आहेत.