खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीचे एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने जगणे अवघड केले आहे. मुलीच्या आई-वडिलांनी विरोध केला असता त्याने नातेवाइकांना जमा करून बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) दुपारी घडली. मुलीच्या आईने खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तरुणासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणी शोयब बादशाह पटेल याच्यासह अनिस हब्बू पटेल, वसीम अलीम पटेल, मोसीन फत्तू पटेल, मोबीन फतू पटेल, इम्रान अमिन पटेल, मोइन सत्तार पटेल (सर्व रा. राजाराय टाकळी ता. खुलताबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती पती, सासू, मुलगा व १७ वर्षीय मुलीसह राहते. गावापासून ३ किलोमीटर अंतरावर राहणारा शोयब बादशाह पटेल हा त्यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करतो. तिच्यासोबत मला लग्न करायचे आहे, असे गावातील लोकांना सांगतो. मुलगी मला दिली नाहीतर मी मुलीला पळून नेईल, असे सांगत असतो.
मात्र मुलीला त्याच्यासोबत लग्न करायचे नसल्याने तिच्या आई-वडिलांनी शोएबला समजावले आहे. तरीही तो ऐकत नाही. मुलीच्या गल्लीत बुलेट घेऊन येतो व हाॅर्न वाजवतो. कधीकधी त्याची स्कार्पिओ गाडी घेऊन घरासमोर येऊन उभा राहतो व हॉर्न वाजवतो. गुरुवारी दुपारीही तो स्कार्पिओ गाडी घेऊन मुलीच्या घरासमोर येऊन उभा राहिला. मुलीच्या आईने त्याला सुनावले असता त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे मुलगी व मुलीच्या वडिलांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याचे नातेवाइक बोलावून शिवीगाळ व मारहाण करायला सुरुवात केली. मुलीलाही हातातील लाकडी काठीने मारले. मुलीच्या वडिलांना सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.