छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एचपी कंपनीत नागपूरला मॅनेजर असलेल्या युवकाचे छत्रपती संभाजीनगरातील घर फोडून चोरट्यांनी १ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना सातारा परिसरातील गुरुकृपानगरात (सुधाकरनगर रोड) गुरुवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ११ ला समोर आली. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) या प्रकरणात तक्रार देण्यात आल्याने सातारा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय गणेश सोमवंशी (वय ३१, रा. गुरुकृपानगर, सुधाकरनगर रोड, सातारा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते नागपूरला एचपी कंपनीत मॅनेजर आहेत. ७ ऑगस्टला सायंकाळी ५ ला ते, त्यांची आई, वडील, पत्नी व बहीण असे घराला कुलूप लावून नागपूरला गेले होते. गुरुवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ११ ला शेजारील महिलेने त्यांना कॉल करून कळवले, की तुमच्या घराचे समोरचे दार उघडे दिसत आहे. त्यामुळे अक्षय यांनी त्यांचे मामा संजय चव्हाण यांना घराकडे जाऊन पहायला सांगितले.
त्यांचे मामा दुपारी १ ला गुरुकृपानगरात आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप, लँच लॉक तुटलेले दिसले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसले. कपाटही उघडले होते. अक्षय लगेचच नागपूर येथून घरी आले. कपाटातील सोने, चांदीचे दागिने गायब होते. यात १ लाख रुपयांचे मंगळसूत्र, ६० हजार रुपयांची सोन्याची चैन, २६ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील झुमके असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. अक्षय यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.