छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात वाळू माफिया शिरजोर झाले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी धजावणाऱ्या महसूलच्या अधिकाऱ्यांच्या जिवाशीही खेळण्यास ते कमी करत नसल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीचा हायवा पकडणाऱ्या अप्पर तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाळू माफियाने स्कॉर्पिओ अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. सातारा पोलिसांची वेळीच एंट्री झाली म्हणून हे पथक वाचले. हा थरार सातारा परिसरातील हमालवाड्याजवळील एमआयडीसी रोडवर घडला.
अप्पर तहसीलदार नितीन रमेश गर्जे (वय ४०, रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास श्री. गर्जे हे अप्पर तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी संतोष लोळगे, कल्याण वानखरे व तलाठी योगेश पंडीत, स्वप्नील शेळके, धनंजय साळवे, समाधान पैठणे, दीपक सोनवणे, सुरक्षा रक्षक नारायण मोटे यांच्यासोबत अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तपासणी करत होते.
हमालवाड्याकडे जात असताना एमआयडीसी रोडजवळ हायवातून (MH 20 EK 0404) वाळूची वाहतूक होत होती. त्यांनी हायवा थांबवून तपासणी केली असता हायवातून विनापरवाना सहा ब्रास वाळू नेली जात होती. त्यामुळे कायदेशीर दंडात्मक कारवाईसाठी हायवा अप्पर तहसील कार्यालयात नेण्याची तयारी अप्पर तहसीलदार गर्जे यांनी सुरू केली. त्याचवेळी रात्रीचे ११ वाजून ५० मिनिटांनी नंबर प्लेट नसलेली पांढरी स्कॉर्पिओ तिथे आली. त्यातून सहा ते सात लोक उतरले. त्यांनी अप्पर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाशी वाद घालणे सुरू केले. हायवा तिथून नेऊ लागले. अप्पर तहसीलदारांनी अडवले असता स्कॉर्पिओच्या चालकाने अप्पर तहसीलदारासह त्यांच्या पथकावरच स्कॉर्पिओ घातली.
अप्पर तहसीलदार आणि त्यांचे पथक तातडीने जीव वाचविण्यासाठी बाजूला झाले. त्यानंतर हायवा तिथून पळवून नेण्यात आला. हायवाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न अप्पर तहसीलदारांनी केला असता त्यांच्या गाडीसमोर परत स्कॉर्पिओ लावण्यात आली. त्यानंतर स्कॉर्पिओमधील लोकांनी शिवीगाळ करून दमदाटी करू लागले. त्यामुळे अप्पर तहसीलदारांनी सातारा पोलिसांना कॉल करून बोलावून घेतले. पोलीस येताच सहा जण पळून गेले. स्कॉर्पिओच्या चालकाला पकडून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव हर्षद दिनेश पारेक (वय ३०, रा. दुर्गावाडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्याच्यासोबतच्या व्यक्तीचे नाव भारत लक्ष्मण खरात (रा. इंदिरानगर) असल्याचे त्याने सांगितले. इतरांची नावे मात्र सांगण्यास त्याने नकार दिला. अप्पर तहसीलदार गर्जे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी हर्षद पारेक, भरत खरात या दोघांसह अनोळखी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश देशमुख करत आहेत.