छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आज, १४ सप्टेंबरला पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) रुग्ण दगावल्यावरून नातेवाइक महिला, पुरुषाने चांगलाच राडा केला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सातारा पोलिसांना पाचारण करण्यात आले. राडा करणारा हायकोर्टात वकील असल्याचे सांगत असल्याचे या प्रकरणी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीतून समोर आले आहे. पोलिसांनी शिवाजी जोगदंड व सोबतच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नक्की काय झाले?
हृदय शल्य चिकित्सक डॉ. महेश केशव चौधरी (वय ५०, रा. कांचनवाडी पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी साडेनऊला कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दत्तात्रय सुरेशराव तळेकर (वय ३९, रा. अाविष्कार सोसायटी, प्रथमेशनगर, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) या अत्यवस्थ रुग्णाला त्याचे वडील सुरेश शंकर तळेकर हे व इतर नातेवाइक घेऊन आले होते. रुग्णाचे सिटी स्कॅन व इतर आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्याला हृदयाशी संबंधित क्लिष्ट आजाराचे निदान झाले.
डॉ. चौधरी यांनी सहकारी हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रंजित पालकर, हृदयशल्य चिकित्सक डॉ. महेश केदार, रेडिओ लॉजिस्ट डॉ. जॉर्ज थॉमस यांच्याशी चर्चा करून रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले, की रुग्णाची स्थिती अतिशय गंभीर असून शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाची जगण्याची शक्यता स्थिती अतिशय धुसर आहे. हवे असल्यास तुमचा रुग्ण मुंबई, पुणे येथे हलवू शकतात. त्यानंतर रुग्णाचे वडील व इतर नातेवाइकांनी रुग्णावर कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्येच शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. त्यानंतर पुणे येथून ऑपरेशनसाठी लागणारे विशेष साहित्य मागवून शस्त्रक्रिया चालू केली.
डॉ. केदार, डॉ. चौधरी यांना शस्त्रक्रिया करताना लक्षात आले की रुग्णाची मुख्य रक्त वाहिनी अगोदरच फुटलेली आहे. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती अतिश्य गंभीर झाली होती. त्यामुळे त्याला वाचवता आले नाही. डॉ. केदार यांनी स्वतः बाहेर जाऊन रुग्णाच्या याबाबत सांगितले. आज, १४ सप्टेंबरला पहाटे १२ वाजून ५ मिनिटांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.
मध्यरात्री साडेबाराला सुरू झाला राडा…
पहाटे साडेबाराला (मध्यरात्री) एक महिला व एक पुरुष रुग्णालयात आरडाओरड करतच आले. त्यापैकी पुरुष अश्लील शिवीगाळ करत होता. त्याने कमरेचा बेल्ट काढला व म्हणाला, की मी शिवाजी जोगदंड हायकोर्टात वकील आहे. कुठे आहे डॉ. चौधरी, असे म्हणून तो डॉ. चौधरींकडे आला. त्यांची कॉलर पकडून शिव्या दिल्या. तुम्हीच आमच्या पेशंटला हलगर्जीपणे उपचार करून मारले. तुम्हालादेखील सोडणार नाही, अशा धमक्या देणे सुरू केले. रुग्ण कसा काय मेला, त्याच्यावर काय उपचार केले, अशी विचारणा करू लागला. उपचाराची फाईल डॉ. चौधरींच्या हातून हिसकावली. आयसीयूमधील काचेचा दरवाजा जोरात ओढला. सुरक्षारक्षक सय्यद अन्वर यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनादेखील त्या व्यक्तीने धक्काबुक्की व शिवीगाळ केली. सातारा पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनवणे हे सहकाऱ्यांसह रुग्णालयात धावले. त्यांच्यासमोरही शिवाजी जोगदंड व त्याच्यासोबतची महिला आरडा ओरडा करत होती, असे डॉ. चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता बागूल करत आहेत.