छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपातून शिवसेनेच्या ठाकरे गटात आलेले राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. सध्या शिंदे गटाचे संजय शिरसाट आमदार आहेत. निवडणुकीत संघर्ष कोणत्या टोकाला याची चुणूक आताच दोघांनी दाखवून दिली आहे. दोघांत आतापासूनच आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. आ. शिरसाट हे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप राजू शिंदे यांनी केला आहे, तर चिकलठाण्यात हप्तेखोरी करणाऱ्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत, असे सणसणीत प्रत्युत्तर आ. शिरसाट यांनी दिले आहे.
राजू शिंदे यांचे आरोप…
ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की आमच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. शिरसाट यांचे अनेक कार्यकर्ते गुंडागर्दी, अवैध दारूविक्री व अतिक्रमणे करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. विरोधकांना मी कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवून निवडणूक जिंकेन अशा धमक्या दिल्या जात आहेत. पोलीस आयुक्त माझ्या शिफारशीनेच आले असल्याचा दावा आमदार शिरसाट करत आहेत, असे आरोपही राजू शिंदे यांनी केले आहेत.
आ. शिरसाट यांचे प्रत्युत्तर…
आ. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन राजू शिंदे यांच्यावर प्रत्यारोप केले. चिकलठाणा परिसरातील उद्योग बंद पाडणाऱ्या हप्तेखोरांना माझ्या मतदारसंघात स्थान नाही. शिंदे या मतदारसंघात राहत नाहीत. त्यांना झालेल्या विकासाची माहिती नाही. हा केवळ राजकीय स्टंट आहे. याउलट ठाकरे गटाचे लोकच दारू पिऊन शिव्या देत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.