गारज, ता. वैजापूर (किरण सरोवर / सीएससीएन वृत्तसेवा) : साल्याच्या ३ वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह गारज (ता. वैजापूर) शिवारात फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दुपारी दोनला समोर आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका शेतकऱ्याला आढळल्यानंतर खळबळ उडाली. शिऊर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर डॉक्टरांनी जागेवर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
काय आहे घटना…
पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याचा राग मनात धरून राहुल पोपट बोधक (वय ३०, रा. चांदेगाव, ता. वैजापूर) याने साल्याचा मुलगा स्नेहदीप अभिजीत त्रिभुवन (रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) याचे अपहरण करून खून करून मृतदेह शिऊर बंगला परिसरात फेकून दिल्याची माहिती पोलिसांना ९ सप्टेंबरला मिळाली होती. विरगाव पोलिसांच्या मदतीने श्रीरामपूर पोलिसांनी श्वानपथकाला सोबत घेऊन परिसर पिंजून काढला होता. मात्र मृतदेह मिळून आला नव्हता. घटनेच्या सात दिवसांनी शुक्रवारी दुपारी दोनला गारज परिसरातील कचरू तुपे यांच्या गट क्रमांक ६७ मधील मकाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तुपे यांना आढळला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.