सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील वरठाण व बनोटीतांडा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावे घेत जखमी केल्याची घटना शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी आठला घडली.
वरठाण येथील तय्यब कुरेशी (वय ४७), भास्कर संसारे (वय ५५), कौतिक संसारे (वय ६५), आशाबाई सांडू संसारे (वय ३८), पमाबाई होना खैरनार (वय ४२), प्रियांका भुजंगराव फासे (वय २३) आणि बनोटीतांडा येथील नीलेश कीरण पवार (वय ९), अनिता भदू जाधव (वय १८) अशी जखमींची नावे आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याच्या शोधासाठी तरुण काठ्यालाठ्या घेऊन पाठलाग करत होते. तीन तासांनंतर नागरिकांनीच पिसाळलेल्या कुत्र्यास मारून टाकले. आठही रुग्णांवर बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून वरठाण येथील सहा जणांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बनोटीतांडा येथील दोन जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
पाचोरा (जि. जळगाव) येथून एका गाडीत मोकाट कुत्रे आणून ते रात्रीच्या वेळी वरठाण परिसरात सोडण्याचा प्रकार अनेकवेळा झाला आहे. गावातील कुत्री व सोडलेली कुत्री यांच्यात संघर्ष होतो. त्यातच काही कुत्रे जखमीदेखील होतात. तीच पिसाळून दिसेल त्याला चावत सुटतात. सोडलेली कुत्रे वरठाण बसस्थानक परिसरातच राहतात. रात्रीच्या दहा- अकरानंतर ती दुचाकी धारकांच्या मागे लागतात. घाबरलेल्या अवस्थेत काही दुचाकीधारक पडून जखमी झाल्याची घटनादेखील घडल्या आहेत.
मार्निंग वाॅक बंद
गेल्या सहा महिन्यांपासून कुत्र्यांनी गावात दहशत निर्माण केल्याने गावातील लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक तरुण मंडळी सकाळी पाच वाजता मार्निंग वाॅकसाठी जातात. पण ही कुत्री अंगावर धावून येत असल्याने अनेकांनी मार्निंग वाॅकला जाणे बंद केले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.