सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : गावात शेजारी राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने पुण्याला बोलावून घेत वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिच्या पतीने ती हरवल्याची तक्रार दिल्यानंतर दोघांचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला कॉल करून विवाहितेला घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी विवाहितेने स्वःखुशीने त्याच्याकडे गेल्याचे सांगितले. पण त्याच्या धमक्या कमी होत नसल्याने तिने आता बलात्काराची तक्रार अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) राहुल संजय गव्हाणे (रा. गोळेगाव बुद्रूक ता. सिल्लोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार युवती सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक वर्षापूर्वी एकाच्या घरात किरायाने राहत असताना शेजारीच राहुल संजय गव्हाणे राहत होता. सन २०२३ मध्ये युवती आणि राहुलची ओळख झाली. तेव्हा त्याने तिचे फोटो काढले होते. हे फोटो दाखवून तो तिला म्हणाला, की मला तुझ्यासोबत भेटायचे आहे. त्यावर युवतीने नकार दिला. त्यानंतर राहुल पुणे येथे कामासाठी गेला होता. १ जून २०२४ रोजी राहुलने तिला मोबाइलवर कॉल केला व म्हणाला, की मला तू आवडते. मी तुझ्यासोबत लग्न करतो. तुझ्या मुलांना सांभाळतो. तू माझ्याकडे पुणे येथे रहायला ये. त्यावर युवतीने टाळाटाळ केली. तेव्हा त्याने तिला धमकावले, की तू जर माझ्याकडे आली नाही तर तुझे फोटो माझ्याकडे आहेत.
मी तुझी बदनामी करेल. त्यानंतरही त्याने तिला फोन करून तुझ्यासोबत लग्न करतो. तुझ्या मुलांनाही सांभाळतो, असे आश्वासन देऊन त्याच्याकडे येण्याचा तगादा लावल्याने ती २ जून २०२४ रोजी मुला-मुलीसह बसने त्याने दिलेल्या पत्त्यावर कुरकुंभ ता. दौड जि. पुणे येथे गेली. तेथे राहुलने किरायाने खोली घेतली होती. त्याच ठिकाणी युवती राहुलसोबत एक महिना राहिली. दरम्यानच्या कालावधीत राहुलने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तिने राहुलला लग्न कधी करायचे, असे विचारले असता त्याने तिला व तिच्या मुलाला मारहाण केली. त्यामुळे ९ जुलै २०२४ रोजी ती मुला-मुलीला घेऊन परत गोळेगावला आली. त्यानंतरही राहुलने तू माझ्याकडे ये, असा तगादा लावून धरल्यामुळे पाच- सहा दिवसांनी ती पुन्हा मुलीसह कुरकुंळ (ता. दौंड) येथे गेली. तेव्हाही त्याने कुरकुंभ येथे तिच्यासोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले होते.
१९ जुलै २०२४ रोजी युवतीच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार अजिंठा पोलीस ठाण्यात केली. तेव्हा आपली पत्नी राहुलसोबत असल्याचे त्याला माहीत झाल्याने त्याने पोलिसांना कळवले. पोलीस ठाण्यातून राहुलला फोन आल्याने दुसऱ्या दिवशी ती व राहुल गोळेगावला परतले. तेव्हा राहुल तिला म्हणाला, की तू जर माझ्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर मी तुला व तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे युवतीने पोलिसांत तक्रार दिली नाही. आमचे दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून मी स्वखुशीने त्याच्यासोबत गेल्याचे भीतीपोटी पोलिसांना सांगितल्याचे आता युवतीने तक्रारीत म्हटले आहे. मात्र राहुल तिला वारंवार धमक्या देत असल्याने आता युवतीने तक्रार दिल्याचे म्हटले आहे.