छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भूमिपुत्र संघटनेच्या वतीने गुरुवारी (१२ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गंगापूर तालुक्यातील शेती महामंडळाची पडीक शेती सर्व जाती-धर्माच्या भूमिहीन शेतमजुरांना भाडे पट्ट्यावर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आमखास मैदानावरून दुपारी मोर्चाला निघाला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती मारुती साळवे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नंतर शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चर्चा केली. शिष्टमंडळात नारायण भरपुरे, मुन्ना जहागिरदार, अनिल तुपे, भास्कर केदारे, शिवाजी शिंदे, अनिता सरदार, भास्कर खंडागळे, सुनीता पनाड, नितीन दाभाडे, प्रकाश पारखे, अनिल साळवे, रचना गवलवाड, ज्योती गायकवाड, सीमा बागुल व अर्चना ननुरे यांचा समावेश होता.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गंगापूर तालुक्यात शेती महामंडळाची सुमारे चार हजार एकर शेती २५-३० वर्षांपासून पडीक आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी गंगापूर तहसीलदारांनाही निवेदन सादर करण्यात आले. आता शेती महामंडळाने या पडीक शेतीला भाडेपट्ट्यावर देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ती निविदा १३ सप्टेंबर रोजी पुणे येथील महामंडळाच्या कार्यालयात उघडण्यात येणार आहे. ती निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनात केली आहे.