छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जो व्यक्ती एका धोब्याचे ऐकून स्वत:च्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढतो, असा व्यक्ती देव कसा असू शकेल? आणि अशा व्यक्तीची आपण देशात मंदिरे बांधतो, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, अशी अश्लाघ्य टीका तथाकथित विचारवंत ज्ञानेश महाराव याने संभाजी बिग्रेडच्या मुंबई येथील अधिवेशनात बोलताना केली. याविरोधात गुरुवारी (१२ सप्टेंबर) भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
टाळ, मृदंग वाजवत भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांतीचौक दणाणून सोडला. ज्ञानेश महाराव यांचा बोलविता धनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याचा आरोप करत शरद पवार यांच्या निषेधाच्याही घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासह विकास जैन, रामूकाका शेळके, सजन बागल, सुदर्शन महाराज, संजय जोशी, रामेश्वर भादवे, जालिंदर शेंडगे, संतोष महाराज गोरे, आप्पासाहेब हरणे, गजानन महाराज गव्हाणे, नामदेव महाराज हरणे, बबन महाराज गोजे, बाबासाहेब वाघ, ऋषी नरवडे, बंडू उकिरडे, अर्जुन बागडे, साईनाथ म्हस्के आदींची उपस्थिती होती. यावेळी बोराळकर म्हणाले, की सकल हिंदू समाज आणि समस्त वारकऱ्यांची अस्मिता असणारे प्रभू श्रीरामचंद्र, श्रीस्वामी समर्थ यांच्याबद्दल शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांचा बोलविता धनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. त्यांचा जाहीर निषेध करतो.
काय म्हणाला ज्ञानेश महाराव…
जर माझ्या बहिणीला कुणी घरातून बाहेर काढले, तर मी शांत राहीन का ? तो म्हणे एकपत्नी होता ! सायंकाळी चालणाऱ्या मालिकेत काय चालते, तर ‘स्वामी-स्वामी’! प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांची बायको म्हणते की, ‘वरून उडी मारली तरी स्वामी वाचवतील’, मग अशांनाच ऑलिंंपिकमध्ये पाठवले पाहिजे. सगळे जर स्वामींमुळे होत असले तर शरद पवार यांनी गेली ५० वर्षांत राजकारण असेच केले का? काही योजना राबवल्या नाहीत का? शाळा उभ्या केल्या नाहीत?