छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा, त्यांचा संबंध मविआशी असल्याचा जावईशोध आजवर ज्याप्रकारे लावण्यात आला, त्याचप्रकारे आता राजश्री उंबरे यांचा संबंध भाजपशी लावण्याचा प्रयत्न काही थिल्लरांनी केला आहे. मरणासन्न अवस्थेत जाऊनही गेल्या १० दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या हट्टासाठी पेटून असलेल्या राजश्री उंबरे यांनी अशा थिल्लरांना गुरुवारी (१३ सप्टेंबर) मी मराठा समाजाची लेक म्हणून उपोषणाला बसले आहे, या शब्दांत सुनावले.
काही महाभागांनी राजश्री उंबरे यांच्यावर भाजपच्या पदाधिकारी असल्याचा आरोप केला आहे. मात्र आपण सहा महिन्यांपूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगत राजश्री उंबरे यांनी राजीनामा पत्रही पत्रकारांना दाखवले. त्या म्हणाल्या, की मराठवाड्यातील मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मी उपोषण करीत आहे. मराठा आरक्षण हा आता राजकारणाचा विषय बनला आहे. प्रत्येकजण त्याला राजकारणाच्या चष्यातून पाहतो. यातूनच मराठा समाज होरपळला जात आहे.
माझ्याही वैयक्तिक आयुष्यावर काही लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत. मुख्यतः शेती व्यवसाय करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. मराठवाड्यातील मराठा समाज हा हैदराबाद संस्थानात असताना कुणबी होता. असे असताना मराठवाड्यातील मराठा समाजाला खुल्या प्रवर्गात का टाकण्यात आले, असा सवाल राजश्री उंबरे यांनी करत, आम्ही आमच्या हक्काचे १९ टक्के ओबीसीचे आरक्षण मागत आहोत. राज्यातील अन्य प्रांतातील मराठा समाज प्रगतशील असूनही ते ओबीसीचे आरक्षण घेत आहे. यामुळे आमच्या समाजाच्या हक्कासाठी हे उपोषण करत असल्याचे सांगितले.
…१८ सप्टेंबर तुमची लाडकी बहीण दिसणार नाही : राज्य सरकारला गर्भीत इशारा
१७ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न केल्यास १८ सप्टेंबरला तुमची लाडकी बहीण दिसणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. गुरुवारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी उपोषणस्थळी येऊन राजश्री यांची भेट घेत चर्चा केली.