छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध आतापर्यंत ६० गुन्हे दाखल होऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. गेल्या आठवड्यात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन रामगिरी महाराजांविरुद्ध कारवाईसाठी सरकारला ५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तो संपल्यानंतर मुस्लिम बांधवांसह मुंबईत धडकणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या इशाऱ्याची दखल घेतली न गेल्याने जलील यांनी आता २३ सप्टेंबरची तारिख जाहीर केली असून, या दिवशी ते मुस्लिम बांधवांसह मुंबईत धडकणार असल्याचे बुधवारी (११ सप्टेंबर) बैठकीत ठरले.
महाराष्ट्र, तेलंगाणा, मध्य प्रदेशातूनही हजारोंच्या संख्येने मुस्लिम रॅलीत सहभागी होणार असल्याचे एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना संविधानाची एक प्रत भेट देणार असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शपथेची प्रत भेट देणार आहोत, असे ते म्हणाले. जलील यांनी नीतेश राणे यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. शासन बेछुट, बेताल वक्तव्य करणाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीसोबत अजूनही आपली युती होईल, अशी आशा एमआयएमला आहे. आणखी १०-१२ दिवस वाट पाहून आम्ही आमचा निर्णय घेऊ, असेही जलील म्हणाले.