छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून ४९० अर्ज नेण्यात आले. पैकी २८९ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन, ऑफलाईन प्रक्रिया सुरू असून एक खिडकी सुरु आहे. नोंदणी प्रक्रिया करता यावी यासाठी शनिवार (७ सप्टेंबर) व रविवार (८ सप्टेंबर) या सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त धर्मादाय विशाल शेंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१- क अन्वये सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमाकरिता लोकवर्गणी जमा करण्याकामी परवानगी देण्यात येत असते. यासाठी धर्मादाय विभागाचे संकेतस्थळ https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Event Registration या सदराखाली ऑनलाईन नोंदणी करता येते. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नसेल, अशा इच्छुक मंडळांना विहीत नमुन्यात अर्ज सादर केल्यास ऑफलाईन परवानगी देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर विभागात इच्छुक मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की, सध्या गणेश उत्सवाचा कालावधी असून, अनेक मंडळ गणेश स्थापनेसाठी परवानगी घेणे कामी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करीत आहेत. सद्य:स्थितीत कार्यालयात एकूण ४९० अर्ज विक्री झाले असून ४३ ऑनलाईन व ३१० ऑफलाईन अर्ज आले आहेत. ३१० अर्जांपैकी २८९ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे.
‘एक खिडकी’च्या माध्यमातून कार्यालयात अर्ज विक्री, स्विकृती, तपासणी व तात्काळ परवानगी देण्यात येत आहे. परवानगी देण्याच्या कार्यवाहीसाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी संबंधित कामकाज करत आहेत. लोकवर्गणीसाठी परवानगी घेण्याकरिता ऑनलाईन, ऑफलाईन अर्जांच्या विहीत नमुन्यासोबत ठरावाची प्रत, जागामालकाचे ना हरकत, पत्याचा पुरावा म्हणून लाईट बिलाची मूळ प्रत व आधार कार्डची प्रत असणे आवश्यक, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, इलेक्शन कार्ड) मागील वर्षाचा हिशोब, मागील वर्षी घेण्यात आलेल्या परवानगीची प्रत सादर करावी व परवानगी मिळवून घेण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे यांनी केले आहे.