छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेशोत्सवात कानाचे पडदे फाडून टाकणारे लाऊडस्पीकर लावत असाल तर खबरदार… ध्वनीप्रदूषण नियम आणि कायद्यानुसार अशा मंडळांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. ही पथके शहरात करडी नजर ठेवून आहेत.
उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी कळविले आहे, की छत्रपती संभाजीनगर तहसीलदारांची याकामी पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या पथकांमध्ये महानगरपालिकेचे वाॅर्ड अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांचाही समावेश आहे. या संदर्भात ४ सप्टेंबरला बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. पथकांनी महानगरपालिका हद्दीत स्थापन केलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मार्गदर्शक तत्वांचे पालन होत असल्याची खात्री करावी. गणेश मंडळांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या असून गणेश मंडळांनी स्थापनेआधीच न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सुधारणा करावी. ज्या ठिकाणी न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येईल तेथे कारवाई करण्यात यावी. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.