बॉलीवूड अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघाची भाजप खासदार कंगना राणावत सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंगनालाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेक्षकांनी तिचा चित्रपट का पाहावा याबद्दल सांगत आहे. मात्र, कंगनाचा हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. कंगनाला सतत बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कंगणाने सांगितले की, तिच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अद्याप प्रमाणपत्र दिलेले नाही. चित्रपटाला रिलीजसाठी मान्यता मिळाल्याच्या अफवा चुकीच्या आहेत. ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.
कंगनाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत दावा केला आहे की तिला आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या सदस्यांना धमक्या येत आहेत. माजी पंतप्रधानांची शीख सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेली हत्या दाखवू नये यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. सततच्या धमक्या येत असताना हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार की नाही हा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण खुद्द कंगनाने तिच्या चित्रपटाला सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे. कंगना म्हणाली, की आमच्या चित्रपटाला मंजुरी मिळाली होती. मात्र त्याचे प्रमाणपत्र थांबवण्यात आले आहे.
कारण, भरपूर धमक्या येत आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या लोकांनाही धमक्या येत आहेत. इंदिरा गांधींचा मृत्यू दाखवू नये, जर्नेलसिंग भिंद्रनवाले दाखवू नये, पंजाब दंगलीची दृश्ये दाखवू नयेत, मग काय दाखवायचे? या वेळी आणि ही जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावर विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण झाले आहे. हे सर्व या देशातील एकाच राज्यात घडत आहे. या व्हिडीओपूर्वी कंगनाने एक पोस्ट लिहिली होती. डोळ्यात गोंधळ, हृदयात दुःख, हे जग आहे की दु:खाची दुनिया, तरुण शरीरे बाजारासारखी सजतात, इथे प्रेम होते व्यवसायासारखे, निष्ठा काही नाही, प्रेम काही नाही… तिच्या या पोस्टचे अनेक अर्थ लावले जात आहेत.