अभिनेत्री चाहत खन्नाने बडे अच्छे लगते हैं, कुबूल है, थँक-यू आणि प्रस्थानमसारख्या टीव्ही शो आणि चित्रपटांमधून आपली छाप पाडली आहे. आपल्या कामाबद्दल निवडक असलेली ही अभिनेत्री दहापैकी फक्त एक किंवा दोनच ऑफर्सना होकार भरते. कारण तिला दर्जेदार काम करायचे आहे. जेवढे लक्ष ती तिच्या कामाकडे देते, तेवढेच लक्ष ती आपल्या मुलींकडेही देते. व्यस्त वेळापत्रक असूनही तिने आजपर्यंत तिच्या मुलीची शाळेतील एकही पालक बैठक चुकवली नाही. सध्या ती “पती, पत्नी और कांड’ या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. सध्याच्या आयुष्याबद्दल विशेष मुलाखतीत तिने अनेक रोचक खुलासे केले…
चाहत म्हणाली, की मी “पती, पत्नी और कांड’ वेबसिरिजमध्ये डीसीपीची भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यात माझी अनेक पोलिसांशी मैत्री आहे. नेते व वकिलांसोबत उठबस आहे. युनिफॉर्म घातल्यावर माझ्या अंगावर शहारे आले होते. मी पोलिसाची भूमिका करेन असे कधीच वाटले नव्हते. या मालिकेत शूटआऊटपासून एन्काऊंटरपर्यंत सर्व गोष्टी मला करायच्या आहेत. मी मार्शल आर्ट्स शिकलेले आहे. ते माझ्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल असे त्यावेळी मला वाटले नव्हते, पण ते आता या रोलसाठी कामी आले.
दहापैकी फक्त एक किंवा दोनच कामे घेते…
तुम्ही मला पडद्यावर फार कमी पाहिले असेल. मी स्वीकारण्यापेक्षा जास्त ऑफर नाकारते. एकच पात्र पुन्हा पुन्हा सादर करताना मला वैताग येतो. त्यामुळे मी दहापैकी फक्त एक किंवा दोनच कामे स्वीकारते. सुरुवातीला मला सर्व काही करायचे होते. पण गेल्या दशकापासून मी दर्जेदार कामावर भर देत आहे. अनेकदा मी छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर येते तेव्हा अपेक्षित कौतुक होत नाही. प्रसिद्धी मिळत नाही. पण एक कलाकार म्हणून चांगले काम केल्याचे समाधान मला असते. सिरियल किंवा मुव्ही हिट होईल की नाही हे त्या सिरियल, मुव्हीचे नशिब असते.
लखनवी बिर्याणी माझी आवडती
मी २०१९ मध्ये प्रस्थानम टीव्ही शोच्या शूटिंगसाठी लखनौला गेले हाेते. तिथले पोशाख मला खूप आवडले. विशेषतः चिकन कुर्ती. जेवणाबद्दल बोलायचे झाले तर बिर्याणी माझी आवडती आहे. शूटिंगच्या बाबतीत मला मुंबई आणि लखनौमध्ये फारसा फरक दिसला नाही. मला तिथला एक प्रसंग आठवतो. आम्ही एका गावात एन्काउंटर सीन शूट करत होतो, जिथे खरे पोलीस आले होते. त्यानंतर सेटवर पोलिस गेटअपमधील अनेक लोक उपस्थित असल्याने आमची शस्त्रे तपासण्यात आली.
आईने फोनसाठी कानातले विकले होते…
मी नृत्यांगणा आहे. वयाच्या १४ व्या वर्षीपासून मुला, मुलींना नृत्य शिकवले. माझा पहिला फोन आईने घेऊन दिला होता. माझ्या आईने त्यासाठी स्वतःचे सोन्याचे झुमके विकले होते. माझ्याकडे अजूनही तो फोन आहे. एकदा मी तोच फोन बसमध्ये सोडला होता. पण बसमागे एक किलोमीटर धावून बस थांबवत फोन परत मिळवला. आज स्वत:ला या टप्प्यावर पाहून वाटते की मेहनतीचे फळ मिळते.
लहानपणापासून लेखनाची आवड
मी टीव्ही, चित्रपट किंवा ओटीटीसाठी काम करत आहे. माझ्या कामातून मला समाधान मिळाले तर मी स्टेजवरही परफॉर्म करण्यास तयार आहे. आजकाल मी थिएटरही करत आहे आणि भविष्यात नाटकांचे दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी मी लेखक होते. मला लहानपणापासून लेखनाची आवड आहे. मी अनेक स्क्रिप्ट लिहिल्या आहेत पण अजून काही दिग्दर्शन केलेले नाही. लवकरच मी लोकांसमोर काहीतरी नवीन घेऊन येणार आहे.
आईची भूमिका करणार का?
अभिनेत्री चाहत खन्ना सांगते की, जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात आई बनता तेव्हा लोक आईच्या भूमिकेसाठी तुमच्याकडे येऊ लागतात. मलाही अशा अनेक ऑफर आल्या आणि मी काहींना हो म्हटलं. माझ्यासाठी मुलीची पालक-शिक्षक बैठक शूटिंगइतकीच महत्त्वाची आहे. मी आजपर्यंत माझ्या मुलीची एकही पालक बैठक चुकवली नाही. बऱ्याच वेळा इतर मुला- मुलींचे पालक सभेला येत नाहीत पण मी हजर असते. माझ्यासाठी तिचे फुटबॉल सामने, स्पर्धा, सर्वकाही महत्त्वाचे आहे.