छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला फायटरने मारहाण केल्याची घटना हडको एन १२ मधील सिद्धार्थनगरात बुधवारी (४ सप्टेंबर) सकाळी घडली. विवाहितेच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आम्रपाली अमोल बोर्डे (वय २३, रा. सिद्धार्थनगर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. अमोल पंडीत बोर्डे (वय ३०, रा. सिद्धार्थ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ती पती, सासू, सासरे आणि दोन मुलींसह राहते. लग्न झाल्यापासून पती व सासू काही ना काही कारणावरून आम्रपालीला शिवीगाळ करून मारहाण करतात. दोन मुली जुळ्या असून त्यांच्यासाठी पैसे मागितले तरी पती देत नाही. पैसे मागितले की माहेरी निघून जा म्हणतात. चारित्र्यावर संशय घेतात.
बुधवारी सकाळी नऊला आम्रपालीचे आई-वडील तिच्याकडे आले होते. तेव्हा सासूने शिवीगाळ सुरू केली. पतीने आम्रपालीला फायटरने तोंडावर मारले. पोटात लाथा मारून खाली पाडले. आम्रपालीला तिच्या आई-वडिलांनी घाटी रुग्णालयात नेले. यावेळी परत तिला सासरी पाठवू नका अन्यथा जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे आम्रपालीने तक्रारीत म्हटले आहे. घाटीत रुग्णालयातून उपचार घेऊन आम्रपालीने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा पती अमोल आणि सासू संगिता पंडीत बोर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भारती गायकवाड करत आहेत.