छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनमानी व्यापारी प्रथा लागू करून ग्राहकाला छळणाऱ्या आणि वरून आपल्या कृत्याचे समर्थनक करणाऱ्या जालना रोडवरील हुंडाई शोरूमला ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच दणका दिला आहे. कार विक्रीपोटी ग्राहकाकडून घेतलेल्या १८ लाख ३६ हजार रुपयांचा हिशोब त्यांना द्या. हिशोबाच्या सर्व प्रकारच्या पावत्या, वाहनाशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे आणि घेतलेल्या पैशातून शिल्लक राहिलेली रक्कमही परत करा, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा शिल्पा डोल्हारकर, सदस्य गणेश सेलूकर आणि जान्हवी भिडे यांनी दिले. हिशोब न दिल्याबद्दल १५ हजार रुपये, कारवर स्टीकर चिटकवून केलेल्या जाहिरातीपोटी १५ हजार रुपये, मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये नुकसानभरपाईसुद्धा शोरूमला द्यायला सांगितली आहे.
ॲड. महेश शहाजी भोसले यांनी लखानी हुंडाई शोरूमची तक्रार ग्राहक मंचात केली होती. तक्रारीनुसार, त्यांनी २ जून २०२१ रोजी जालना रोडवरील लखानी हुंडाई शोरूममधून क्रेटा एस एक्स डिझेल कार विकत घेतली होती. कारसाठी त्यांच्याकडून १८ लाख ३६ हजार रुपये व इन्शुरन्ससाठी ७९,२४० रुपये घेतले होते. घेतलेल्या कोणत्याही रकमेच्या पावत्या त्यांना देण्यात आल्या नाहीत.
कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. कर्जासाठी कागदपत्रे घेतली, पण कर्ज उपलब्ध करून दिले नाही. ती सर्व प्रक्रिया त्यांना स्वतः करावी लागली. इन्शुरन्सपोटीही दुप्पट रक्कम घेतल्याचा आरोप तक्रारीत केला होता. कारची नंबरप्लेट बसवताना त्यावर स्वतःच्या जाहिरातीचे स्टीकर लावले होते. ही मनमानी ग्राहक मंचालाही पटली नाही. शाखेच्या मॅनेजरने केलेल्या केलेल्या चुकांचेही समर्थन निर्लज्जपणे मंचापुढे केले. मात्र मंचाने त्यांना फटकारत दंड ठोठावला.