छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबादला भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने ट्रिपलसीट निघालेल्या तिघांना दौलताबाद किल्ला परिसरात टेम्पोने चिरडले. यात १९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (३१ ऑगस्ट) पहाटे घडली. दोघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
सूरज उर्फ शिवराज नंदू काकडे (वय १९, रा. साऊथ सिडको वाळूज महानगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. राहुल विलास मोरे (वय १८) व सिद्धार्थ रतन ढाबे (वय १९, रा. साऊथ सिडको वाळूज महानगर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तिघे मित्र दुचाकीने (क्र. एमएच २० एफएल. ३१३६) भद्रा मारुतीच्या दर्शनाला जात होते. टेम्पोने (एमएच ४३ बीपी ८२९५) जोरात धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारी, अंमलदार दीपक मते, महेश घुगे, ज्ञानेश्वर कोळी, राजेंद्र सोनवणे, दीपक पठारे, प्रभाकर पाटेकर यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पहाटे तीनला सूरजचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.