कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : करंजखेड (ता. कन्नड) येथील १४ वर्षीय मुलीचा ताप आल्यानंतर कावीळ झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
भाग्यश्री गणेश वाघ असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ती करंजखेडच्या भारत ग्रामीण विद्यालयात आठवीत शिकत होती. भाग्यश्रीला १५ दिवसांपूर्वी ताप आला होता. गावातील दवाखान्यात उपचार घेऊनही ताप कमी होत नसल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला. तापेनंतर कावीळ झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी सकाळी १० वाजता करंजखेड येथे भाग्यश्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.