छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३० वर्षीय मूकबधिर युवकाचा मृत्यू झाला. खड्ड्यात पडल्यानंतर कुणी बाहेर काढलेही असते, पण मूक असल्याने तो मदतीसाठी पुकाराही करू शकला नाही अन् १४ तासांनी ही घटना समोर आली. सिडको चौकात गुरुवारी (दि. २९) सायंकाळी घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता निदर्शनास आली.राजू नानासाहेब गायकवाड (३०, रा. मुकुंदनगर, संजयनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये मूकबधिर राजू काम करत होता. गुरुवारी तो कामावर गेला पण रात्री घरी परतलाच नाही. त्याच्या घरी असलेले अपंग वडील, मूकबधिर बहीण व दृष्टिहीन भाऊ चिंतित झाले. या सर्वांचा उदरनिर्वाह राजूवरच अवलंबून होता. शुक्रवारी सकाळी काही लोकांच्या ही बाब लक्षात आली. लोक जमा झाले. खड्ड्यातील लोखंडी पाइपवर पडून गंभीर जखमी झालेल्या राजूला हॉटेलचालकांनी ओळखून तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
राजूच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी युवा सेनेचे हनुमान शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सतीश गायकवाड, एमआयएमचे काकासाहेब काकडे, सौरभ सोनवणे, अमोल बनकर, योगेश सोनवणे यांच्यासह राजूच्या कुटुंबीयांना घेऊन सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठिय्या देत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केल्या नव्हत्या.
खोल खड्डा खोदलेला असताना पत्रेही नव्हती. सूचना फलक किंवा लाइट, बॅरिकेड्सदेखील नव्हते. त्यामुळेच खड्ड्यात पडून राजूचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिक आणि राजूच्या कुटुंबीयांच्या आक्रोशानंतर सिडको एमआयडीसी पोलिसांनी ठेकेदार कंपनीच्या मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनी मालक अजय धनवाले, ठेकेदार भूपेंद्र गुप्ता, व्यवस्थापक विशाल एडके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सिडको चौकात जलवाहिनी टाकण्यासाठी हा ६० फूट खोल खड्डा खोदलेला असून, हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत खासगी कंपनीला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.