छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाला शुक्रवारी (३० ऑगस्ट) अँटी ड्रोन गन मिळाली आहे. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर या गनची चाचणीही घेण्यात आली. या गनमुळे अजिंठा, वेरूळ पर्यटनस्थळे आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यावेळी विनापरवाना ड्रोन आढळल्यास थेट हवेतून त्याला ताब्यात घेता येणार आहे.
दीड वर्षापासून ही गन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ही गन ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे. गनशिवाय अद्ययावत एचडी स्पिकर असलेले सात कॅमेरा ड्रोनदेखील मिळाले आहेत. संशयास्पद ड्रोन दिसून आले तर लगेच त्याच्या सिग्नल यंत्रणेवर या अँटी ड्रोन गनमुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. यातून संशयास्पद ड्रोन उतरवले जाऊ शकते किंवा जिथून ते उडवले गेले तिथेही परत पाठवता येते.
यामुळे घातपाती कारवाया, संशयास्पद चित्रिकरण थांबवता येणार आहे. हे इस्त्रायली तंत्रज्ञान आहे. या गनमुळे १ ते १.५ किमी परिसरातील ब्ल्यूटूथ, इंटरनेटही बंद पडते, हे विशेष. या गनशिवाय मिळालेले ७ अद्ययावत ड्रोन ३६० डिग्री सेन्सर असलेले आहेत. त्याला तीन लेन्स असून, टेलिफोटोची २५ मेगापिक्सेल, ४ के व्हिडीओसाठी १२ मेगापिक्सेल व थर्मल लेन्स ६४० पिक्सेलची आहे. थर्मल लेन्सद्वारे अंधारातदेखील स्पष्ट चित्रीकरण येईल. यात रेकॉर्डर असून पोलीस ५ किमीपर्यंतच्या लोकांना व्हाइस मेसेजद्वारे सूचना देऊ शकणार आहेत.