पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी तिच्या जुन्या मित्रासोबत राजरोस अनैतिक संबंध ठेवत होती. पतीने विरोध केला असता त्याला तिने जीवे मारण्याची धमकी दिली. प्रियकरानेही तिच्या पतीला धमकावले व तिला सोडून देण्यास सांगितले. या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील लोणीकंद भागातील विठ्ठलवाडीत समोर आली आहे. लोणीकंद पोलिसांनी मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यश्री सोपान केंद्रे (रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद पुणे) व मधुकर अंबाजी केंद्रे (रा. सेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड) अशी संशयितांची नावे आहेत. सोपान धोंडीबा केंद्रे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणात श्रीमती रंभाबाई धोंडीराम केंद्रे (वय ६५, ह. मु. चैतन्यनगर, नांदेड, मूळ रा. गुत्ती काकीट ता. उदगिर, जि. लातूर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांना एक मुलगा, तीन मुली आहेत. सर्वांची लग्न झालेली आहेत. मुलगा सोपान धोंडीबा केंद्रे याचे ८ वर्षांपूर्वी ४ एप्रिल २०१६ रोजी भाग्यश्रीसोबत लग्न झाले. लग्नानंतर ६ महिन्यांनी तो भाग्यश्रीच्या माहेरी सेल्लाळी (ता. खंदार, जि. नांदेड) येथे जाऊन राहिला. त्यांना एक मुलगा (वय ६), मुलगी (वय ७) अशी अपत्ये झाली. लग्नानंतर हॉटेल धंदा तसेच इतर कामे सोपान करत होता.
कामानिमित्त सोपान व त्याची पत्नी भाग्यश्री हे पुण्याच्या लोणीकंद भागातील विठ्ठलवाडीत तीन वर्षांपूर्वी आले होते. भाग्यश्रीचा मित्र मधुकर केंद्रे (रा. सेल्लाळी, जि. नांदेड) हा सुद्धा कामधंद्यासाठी पुण्यातच राहत होता. सोपान हा आईला भेटायला आला असता त्याने सांगितले, की पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध असून त्यातून ती सारखे भांडण करत असते. तुला मारून टाकते, तुझ्यासोबत राहणार नाही, अशी धमकी देत असते. भाग्यश्रीचे मधुकर केंद्रेसोबत अनैतिक संबंध आहेत. ती सतत फोनवर त्याच्यासोबत बोलत राहते. ड्युटीवर गेलाे की घरी राहत नाही. भाग्यश्रीला समजावले असता, माझं मी पाहील, तुला काय करायचय ते कर… असे तिने बजावल्याचेही सोपानने आईला सांगितले. तिच्या त्रासाला कंटाळून मी जिवंत राहू शकत नाही. मी मरणार आहे, असे तो आईला म्हणाला असता त्याच्या आईने त्याला समजावले.
प्रियकर म्हणाला, मी तिला सांभाळतो…
मधुकर व सोपान यांच्यात भाग्यश्रीवरून बरेच वेळा वाद झाले. तिच्या माहेरी गावात असताना सोपान व त्याच्यात भांडणही झाले होते. त्यावेळी मधुकरने सोपानला “तू भाग्यश्रीला सोडून दे. मी तिला सांभाळतो. तू आमच्यामध्ये येऊ नको. नाही तर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिली होती. भाग्यश्रीच्या वाढत्या अनैतिक संबंधामुळे आणि त्रासामुळे अखेर सोपानने ५ एप्रिलला राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर भाग्यश्री माहेरी निघून गेली. लोणीकंद पोलिसांनी भाग्यश्री व तिचा प्रियकर मधुकर केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.