छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे हिने पतीच्या त्रासाला कंटाळून बजरंग चौकातील टेलिकॉम हौसिंग सोसायटीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२४ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी प्रतीक्षाने चार पानी चिठ्ठी लिहिली होती. त्यात तिने पतीवर छळाचे आरोप केले होते. या प्रकरणात आज, २५ ऑगस्टला प्रतीक्षाचे वडील प्रकाश भुसारे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रतीक्षाचा पती डॉ. प्रीतम शंकर गवारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक्षाच्या आत्महत्येनंतर डॉ. प्रीतम फरारी झालेला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजच्या हाती प्रतीक्षाने लिहिलेली सुसाईड नोटमधील मजकूर लागला असून, तिच्या आयुष्यात जे घडत होतं, ते धक्कादायक आहे.
काय लिहिलंय चिठ्ठीत प्रतीक्षाने वाचा…
डिअर आहो, खूप जीवापाड प्रेम केलं तुमच्यावर. तुमच्यासाठी स्वत:ला विसरून गेले. हसती खेळती होती मी. पण त्रास देऊन देऊन पार मला मंद करून टाकलंत तुम्ही. स्वावलंबी, अॅम्बिशियस मुलीला डिपेंडेंट केलंत. खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं मी तुमच्याशी. तुम्ही मला जीव लावाल, काळजी घ्याल, करिअरमध्ये सपोर्ट कराल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्याचीच तयारी करत होते मी… गोंडस बाळ असतं आपलं. जर तुम्ही आज ही वेळ माझ्यावर आणली नसती तर… तुमच्यासाठी मी सर्व सोडलं. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडील, भावाशीही बोलल्यावर राग यायचा तुम्हाला. म्हणून त्यांनाही नव्हते बोलत जास्त. तुम्ही म्हणाले मोबाइल बदल. मी बदलला. नंबर बदल म्हणाले, त्यासाठीही मी तयार झाले. तुमचे डाऊट संपत नव्हते. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत होतात. देवाशप्पथ सांगते, मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि आहे… माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही… जे काही आहे ते तुम्हीच आहात. तुमच्या आयुष्यात बायकोची जागा भेटली पण हृदयात मला कधीच जागा नाही दिली तुम्ही. मी खूप हळवी आहे. चारित्र्य महिलेचा सर्वात मोठा दागिना असतो आणि तुम्ही नेहमी त्यावरच चिखल फेकला. सतत संशय घेत राहिलात…
मी खूप वैतागले आहे. तुमच्या वागण्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले. मला आपोआप रडू यायचं, तेही तुम्हाला नाटकं वाटायची. मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमचा बॅडलक सुरू झाले… आज त्यातून तुमची सुटका होईल. तुमचे येणारे असंख्य कॉल्स मला स्टेबल राहू देत नाहीत. ना माझं कामात मन लागतं, ना घरात… मला तुम्ही फोनवर इतकं रडवता, विचारही करत नाही की, ही हॉस्पिटलला असेल. आजूबाजूला लोकं असतील. माझ्या इज्जतीशी तुम्हाला काहीच घेणंदेणंच नाही. कामात असताना किंवा फोन बिझी असताना सतत कॉल करत जाब विचारला जातो. माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे हे दिसते.
कामाच्या ठिकाणीसुद्धा धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेस, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाहीये का, असं बाेलून त्रास देत होतात. माहेरवाल्यांना काहीपण बोलतात. फर्निचरच्या पैशाहून भांडतात. मला नीट पीजी द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. स्वत:ही केला नाही. रोज माझी मेंटल हरॅशमेंट केली तुम्ही. माझ्याकडून आता सहन होत नाहीये हो, तुम्हाला एवढा जीव लावला, तुमच्या घरच्यांनाही जीव लावला तरीही तुम्ही माझ्याविषयी त्यांच्या मनात खूप वाईट गोष्टी पेरत राहिलात. माझा मोबाइल तुमच्यासाठी नेहमी ओपण राहिला. तुमचे फिंगरप्रिंट त्याला जोडलेले आहेत. मला खूप मोठी स्त्री रोगतज्ज्ञ व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. माझ्या आई-वडिलांना मी नसले तरी कुणाल आहे, पण तुम्ही एकटे आहात. त्यांना नीट सांभाळा. आय लव यू सो मच.. बाय, यू आर अ फ्री बर्ड नाऊ…
मी मेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर, हुंडा देणारी बायको भेटेल. तुमची डोकेदु:खी नेहमीसाठी जातेय. बाय आहो, आय वील मिस यू अ लॉट. माझी कदर नाही केली ॲटलीस्ट दुसऱ्या बायकोची करा. माणसाने एवढं डॉमिनेटिंग नसावं. मी तुमची प्रायव्हेट प्राॅपर्टी असेल, पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावं पण लागतं. तुमच्यासोबत जगायचं होतं मला. पण मला तुम्ही कधी समजून घेतलं. फक्त बंधनात ठेवत गेलात. मी स्वत:ला संपवतेय. गोड आहात दिसायला, गोडंच राहा. मला टाईट हग करूनच चितेवर ठेवा…
शेवटची इच्छाही अपुरी..
प्रतीक्षाची शेवटची इच्छा होती, तीही पतीकडून. त्याने टाइट हग करून म्हणजे घट्ट मिठी मारून चितेवर मृतदेह ठेवावा. प्रीतम फरारी आहे. तो तिच्या अंत्यसंस्कारालाही आला नाही.