छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज, २५ ऑगस्टला सकाळी विमानतळासमोर आंदोलन केले. निषेधाचे फलक घेऊन काळे कपडे घालून ते आले. पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेल्यानंतर सुटका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी सव्वा ११ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब, आमदार उदयसिंह राजपूत,आमदार पंकजा मुंडे, खासदार डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर श्री. मोदी हेलिकॉप्टरने जळगावकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

आंदोलनात माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादी काँग्रेसच ख्वाजा शरफोद्दीन यांच्यासह अभिषेक देशमुख, राजू वैद्य, संतोष जेजूरकर, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब गायकवाड, दिग्विजय शेरखाने, सुकन्या भोसले, दीपाली मिसाळ आदींचा सहभाग होता. पोलिसांनी विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच सर्वांना ताब्यात घेतले. ठाकरे गटाचे आ. उदयसिंह राजपूत यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. ते स्वागताला असल्याने नक्की त्यांच्या मनात चाललंय काय, याची चर्चा सुरू झाली होती.

जळगावला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दिदी महिला मेळावा झाला. या मेळाव्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरले होते. तिथून ते जळगावला गेले. ते छत्रपती संभाजीनगरला येणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी केली. पण त्यांना विमानतळात घुसण्याआधीच पोलिसांनी अटक केली. त्यांच्यापर्यंत मविआचे आंदोलन गेलेच नाही. दरम्यान, जळगावच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, की आपल्या माता, बहिणी व मुलींची सुरक्षा आपल्या देशाची प्राथमिकता आहे. सध्या घडलेल्या घटना पाहता महिलांचा राग समजू शकतो. महिलांविरोधात अपराध म्हणजे अक्षम्य पाप आहे. यामधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी. आता महिलांना घरून एफआयआर दाखल करता येणार असल्याची घोषणाही त्यांनी दिली. महिलांवर अत्याचार करणारा वाचणार नाही, असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले.