छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिटी बसमध्ये दोन कॉलेज तरुणींची छेड काढून लय भारी आयटम म्हणणाऱ्या तरुणाला तत्काळ पोलिसांनी अटक केली असून, त्याचा पाहुणचार आता कोठडीत केला जात आहे. लखनसिंग पदमसिंग जराडे (२७, रा. लालवाडी, गोलटगाव) असे या टवाळखोराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी घडली.
कॉलेज तरुणी मुकुंदवाडीच्या असून, त्या शेंद्रा येथील पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्समध्ये शिकतात. शनिवारी सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर त्या घरी येण्यासाठी सिटी बसमध्ये बसल्या. या बसमध्येच लखनसिंगही होता. त्याने मुलींकडे पाहून इशारे सुरू केले. चिकलठाणा विमानतळाजवळ बस आल्यावर हद्दच केली. लय भारी आयटम असे म्हणत त्यांची छेड काढली. विद्यार्थिनींनी धाडस दाखवून हा प्रकार वाहकाला सांगितला.
त्यांनी लखनसिंगला सुनावले. त्यानंतर मुकुंदवाडी बसथांब्यावर मुली उतरल्या असता लखनसिंगही उतरला. त्याने विद्यार्थिनींना गाठून तुमच्यामुळे माझा अपमान झाला. तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तातडीने पालकांना कॉल करून कळवले. त्यांनी मुलींकडे धाव घेऊन त्यांना घेऊन मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले आणि लखनसिंगविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून लखनसिंगला अटक केली आहे.
आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी दादा महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज (वय ५८, रा. हतनूर, ता. कन्नड) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. शर्मा यांनी २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अकोलकरची कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्था आहे. त्याच्या संस्थेत धार्मिक व शालेय शिक्षण घेण्यासाठी १५ मुली राहतात. १३ ते १८ वयोगटातील या मुली आहेत. यातीलच एका १३ वर्षीय मुलीला धमकी देत त्याने बलात्कार केला. तिच्यासोबतच्या १४ वर्षीय मुलीवरही बलात्काराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
तो विद्यार्थिनीकडून सुरुवातीला पाय दाबून घ्यायचा. सर्व मुली झाेपेत असताना २० ऑगस्टला रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास त्याने मुलीला झोपेतून उठवून बोलावले. तिला पाय दाबण्यास सांगितले. ती पाय दाबत असतानाच त्याने बलात्कार केला. त्याला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी न्यायालयात सांगितले, की अकोलकरने असे किती मुलींसोबत लैंगिक वर्तन केले आहे याचा तपास करायचा आहे. मोबाइल जप्त करून त्यात आक्षेपार्ह व्हिडीओ आहेत का हेही तपासायचे आहे, यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.