छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २० वर्षीय विवाहित तरुणी छोट्या बहिणीसोबत आईच्या घरी जात असताना रस्त्यात टवाळखोरांनी शिवीगाळ करत त्रास द्यायला सुरुवात केली. याबद्दल तरुणीने पतीला कळवल्यानंतर तिच्या पतीने तिथे येत टवाळखोरांना जाब विचारला असता टवाळखोरांनी पती- पत्नीला मारहाण केली. यात दाम्पत्य जखमी झाले. ही खळबळजनक घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदनगर येथील तुळजाभवानी शाळेजवळ ३० जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणात बुधवारी (७ ऑगस्ट) मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रोहित म्हस्के व त्याचे दोन मित्र (रा. मुकुंदवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
२० वर्षीय तरुणी पतीसह मुकुंदनगरातील तुळजाभवानी शाळेजवळ राहते. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना मुकुंदवाडी पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यानुसार ती फार्मसीचे शिक्षण घेते. ३० जुलैला संध्याकाळी पतीसोबत भांडण ती आईच्या घरी प्रकाशनगर येथे जाण्यासाठी छोट्या बहिणीसोबत निघाली. तुळजाभवानी शाळेजवळ रोहित म्हस्के व त्याचे दोन मित्र बसलेले होते. त्यांनी तरुणी व तिच्या बहिणीला शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे तरुणीने पतीला कॉल करून बोलावून घेतले. तिथे तिचा पती आला त्याच्यासोबत टवाळखोरांनी वाद घालून रोहित म्हस्केने दगडाने तरुणीच्या डोक्यात मारले. त्यामुळे ती जखमी झाली. रोहितच्या दोन मित्रांनी तरुणी व तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तपास पोलीस अंमलदार प्रकाश जाधव करत आहेत.