खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : गुटखा कारखान्यावर छापा मारून सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने गुटख्यासह मशिनरी व इतर साहित्य असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चाैघांविरुद्ध गुन्हे दाखल करत दोघांना अटक केली. ही कारवाई खुलताबाद शहराजवळील मावसाळा- खिर्डी रस्त्यावरील एका मंगल कार्यालय परिसरात बुधवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री करण्यात आली.
अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद फरीद मोहम्मद झकेरिया (वय ५०), अनिसाबानो मोहम्मद फरीद (वय ४८, दोघे रा. कटकटगेट, छत्रपती संभाजीनगर), हुसेन मोहम्मद सिद्धिकी झुडा (वय ४९), इरफान हारुण तेली (वय ४५, दोघे रा. खिर्डी, ता. खुलताबाद) यांच्याविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हुसेन आणि इरफान यांना गुरुवारी अटक करण्यात आली.
आजवर पोलिसांचे होते दुर्लक्ष…
अनेक वर्षांपासून हा गुटखा निर्मितीचा कारखाना सुरू होता. कारखान्यात अत्यंत जीवघेण्या रसायनापासून गुटखा तयार केला जात होता. बाहेरून सेवा केंद्राचा बोर्ड लावून आत मात्र गुटख्याचे उत्पादन सुरू होते. कारखान्याकडे खुलताबाद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. एक ट्रक आणि दोन टेम्पोत भरून कारखान्यातील साहित्य खुलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले.