छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आंबेडकरी समाज कृतज्ञता सोहळा समितीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी (११ ऑगस्ट) शहरातील टीव्ही सेंटर मैदानावर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शिंदे सरकारने आंबेडकरी समाजासाठी शहरात मोठा निधी दिला. त्यातून उतराई होण्यासाठी हा सत्कार ठेवल्याचे संयोजन समितीतर्फे सांगण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी ५ कोटी, अजिंठा येथे भीम पार्क उभारण्यासाठी ५० कोटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या डिजिटलायझेशनसाठी २५ कोटी असे ८० कोटी रुपये शहराला देण्यात आल्याचे संयोजन समितीने सांगितले. संयोजन समितीत माजी नगरसेवक गौतम खरात (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), जालिंदर शेंडगे (भाजप), अरुण बोर्डे (एमआयएम), महेंद्र सोनवणे (शिंदे गट), विजय मगरे (रिपाइं आठवले गट), कृष्णा बनकर (वंचित बहुजन आघाडी), अशोक भातपुडे (ठाकरे गट), कृष्णा भंडारे, संतोष भिंगारे (काँग्रेस), अॅड. विजय जोंधळे यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.