गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात रोवलेल्या एका विद्युत खांबाच्या ताण दिलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला होता. शेतात वखरताना तारेला धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास घडली. नितीन संतोष तगरे (वय १९, रा. वाहेगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नितीन वाहेगाव शिवारातील स्वतःच्या शेतात वखरणी करत होता. त्याच्या शेतातून महावितरणच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्याला विजेचा धक्का बसल्यानंतर काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांना कळवले. बेशुद्धावस्थेत नितीनला गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. नितीनच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी- आजोबा असा परिवार आहे.