छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रेल्वेस्टेशनवर हमालाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने गुरुवारी (८ ऑगस्ट) सकाळी सहाला खळबळ उडाली. योगेंद्र किशोरीलाल (वय ३०) असे हत्या झालेल्या हमालाचे नाव असून, धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात वार करण्यात आले आहेत.
मूळचा मध्यप्रदेशातील योगेंद्र दोन महिन्यांपूर्वी शहरात कामाच्या शोधात आला होता. तो रेल्वेस्टेशनवर हमाली करू लागला. रेल्वे स्टेशनबाहेरही कामासाठी बोलावल्यावर जात होता. मिळेल ते खाऊन रेल्वेस्टेशनवरच झोपत होता. बुधवारी रात्री गेवराई ब्रुकबाँड येथून ट्रकमध्ये सिमेंट भरून देवळाईतील खडी रोडवर त्याने उतरवले. त्यानंतर दोन मित्रांसह रेल्वेस्टेशनबाहेर दारू पिऊन तो रेल्वेस्टेशनवर झोपण्यासाठी आला होता. रात्रीतून मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून हत्या केली. ही बाब लक्षात येताच लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी मृतदेहाची पाहणी केली. योगेंद्रच्या कुटुंबाला या घटनेबाबत कळविण्यात आले आहे.