छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरक्षणाची लढाई रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मतांनी, डोक्याने लढली गेली पाहिजे. मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणायचे घोषित केले आहेच, ओबीसींनी आता हे ठरवायची वेळ आली की, हे आरक्षण वाचवायचे की नाही… त्यांना आरक्षण वाचवणाऱ्या पक्षाबरोबर राहावे लागेल. शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी बुधवारी (७ ऑगस्ट) केले.

ॲड. आंबेडकर यांनी राज्यात काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरातील आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेने झाला. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, की गावागावात दडपशाही सुरू होती. आम्ही आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्यामुळे ही दडपशाही थांबली. आपल्यालाही कुणाचा तरी आधार आहे, हा ओबीसींचा विश्वास वाढला. ओबीसींना घालून पाडून बोलले जात होते. ते आता थांबले, असा दावा करत ॲड. आंबेडकर म्हणाले, की ही यात्रा चालू ठेवा. आमचे काम हलके झाले आहे. यात्रेमुळे शांतता निर्माण होत आहे, असे अनेक पोलिसांचे फोन मला येत होते, असे ते म्हणाले. तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये, म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित नोव्हेंबरऐवजी दिवाळीआधी होतील, असे भाकितही ॲड. आंबेडकर यांनी वर्तवून छगन भुजबळ, शरद पवार यांना आम्ही यात्रेचे निमंत्रण दिले होते, पण ते आले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली.
आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. पण ते भांडण राजकीय झालंय. त्यामुळे ओबीसींनी सतर्क राहावे. मनोज जरांगे यांना भेटलो तेव्हाही आणि आजही माझा पाठिंबा त्यांच्या मागणीला नाही. कारण ती पूर्ण होऊ शकत नाही. जरांगे राजकारणात आले तर क्रांती होईल. प्रस्थापित मराठ्यांच्या विळख्यातून महाराष्ट्र सुटेल, असे आंबेडकर म्हणाले.
यावेळी पुष्पा उमाळे या वृद्धेने तिच्या पेन्शनमधून जमा केलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश ॲड. आंबेडकर यांना सुपूर्द करण्यात आला. ओबीसींचे तारणहार प्रकाश आंबेडकर असे होर्डिंग्ज सर्वत्र झळकत होते. सभेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, सुजात आंबेडकर, नवनाथ वाघमारे, उत्कर्षा रुपवते, फारुक अहमद, रमेश बारसकर, अविनाश भोसीकर, गोविंद दळवी, प्रियदर्शी तेलंग, मोहन राठोड, नागोराव पांचाळ, नीलेश विश्वकर्मा आदींची भाषणे झाली. सिद्धार्थ मोकळे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश बन यांनी आभार मानले.