छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील चेलीपुरा भागातील अजिंठा दूध डेअरी येथे विना परवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मिती होत असल्याचे आढळल्याने डेअरी चालकावर कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ वातावरणात होत असलेल्या निर्मितीसंदर्भात दुग्धजन्य पदार्थांचे नमुनेही घेण्यात आले आहेत.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. व्ही. पाटील, अजित मैत्रे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ- मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रोडे, श्रीमती जाधवर आदींच्या पथकाने मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री ही कारवाई केली.
या मोहिमेत सहा कॅन मध्ये १४९ किलो दही, १९ किलो पनीर, ४९ किलो एसएमपी पावडर जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व दूध विक्रेते, दूध संकलन शितकरण केंद्र, खासगी सहकारी दुध उत्पादक संस्था यांनी उच्च प्रतिचे भेसळ विरहीत दुध स्विकृती व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व विक्री करावी. त्यासाठी लागणारे वजन काटे प्रमाणित करून घ्यावे. नागरिकांना निर्भेळ व स्वच्छ दुध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे.