छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यातील वेरुळ आणि अजिंठा येथील लेणी या पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. तथापि, पर्यटन विकास करताना स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी स्थानिकांच्या क्षमता बांधणीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, ७ ऑगस्टला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत अजिंठा व वेरुळ या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुविधांचा विकास व अन्य आवश्यक सुविधा निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, पर्यटन विभागाचे विजय जाधव, योगेश निरगुडे, आकाशवाणी केंद्राचे समरजित ठाकूर, सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मधुरिमा जाधव तसेच अन्य अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विमानतळ, रेल्वेस्टेशन वा बसस्थानक कोठेही आलेल्या पर्यटकाच्या मनात पर्यटन स्थळाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी या करिता माहितीचे सादरीकरण विविध माध्यमातून व्हावे. प्रत्यक्ष अजिंठा व वेरुळ लेण्यांच्या ठिकाणी गेल्यावर पर्यटकांना निवास, भोजन, गाईड अशा विविध सुविधा सहज उपलब्ध होणे व त्यात स्थानिक रहिवाशांचा सहभाग असणे याबाबत स्थानिकांच्या क्षमता बांधणीवर भर द्यावा लागेल. पर्यटनातून निर्माण होणाऱ्या व्यवसाय संधींमध्ये स्थानिकांचा सहभाग असला पाहिजे,असे ते म्हणाले. त्यादृष्टीने आराखडा पर्यटन विभागाने तयार करावा,असे निर्देश त्यांनी दिले.