छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन त्यांच्या उत्कर्षासाठी विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत सर्व संबंधित यंत्रणांनी संवेदनशिलतेने पोहोचवावा, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे-पाटील यांनी केले.
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनअंतर्गत आज, ७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपायुक्त (रोहयो) डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, कृषी उपसंचालक तुकाराम मोटे पशुसंवर्धन विभागाच्या श्रीमती हेमा बनसोडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुकेश बारहाते, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक अशोक रसाळ, सहाय्यक वनसंरक्षक दादासाहेब तौर, सहाय्यक संचालक आरोग्य विभागाचे डॉ. जितेंद्र डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी शिरसाट तसेच कौशल्य विकास विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचा उद्देश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करुन त्यांना आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन अशा विविध विभागांच्या योजनांचा लाभ पोहोचवून त्यांना मुख्यप्रवाहात आणणे हा आहे. त्यासाठी इयत्ता नववी आणि दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत विविध सामाजिक संस्था संस्था आणि उद्योगांकडील सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत मदत उपलब्ध करून द्यावी. आरोग्य विभागा अंतर्गत प्रेरणा प्रकल्पामधून समुपदेशन आणि त्यांच्या आरोग्य तपासणीबाबत शिबिर आयोजित करावे असे निर्देश हेलोंढे पाटील यांनी दिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत करण्यात यावी. कौशल्य विकास अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण देण्याच्या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात यावी, असे हेलोंडे-पाटील म्हणाले.
मराठवाड्यात गायरान जमिनीच्या रेकॉर्ड संदर्भात महसूल विभागाने तयार केलेल्या जमिन बँकेचे सहाय्य पशुसंवर्धन विभागाने घेऊन शासकीय गावरान जमिनीवर चारा लागवडीचे नियोजन १० दिवसांच्या आत करून शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही हेलोंडे-पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले. विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये चारा लागवडीचे नियोजन करताना रोजगार हमी योजना विभागाच्या सहकार्याने जमीन निवड, चारा लागवड करावी. पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या वीमा प्रतिनिधीचा फोन नंबर संबंधित ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले.