कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, ७ ऑगस्टला कन्नड तालुक्यात पिक स्थिती पाहणी, विहिर पुनर्भरण कार्यक्रम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नोंदणी आदी कामांची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
जिल्हाधिकारी स्वामी आज कन्नड तालुका दौऱ्यावर होते. महसूल पंधरवडा निमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महसूल प्रशासनाने केले आहे. त्यानिमित्त आज कन्नड तालुक्यातील विविध ठिकाणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट दिली. शिवराई येथे विहीर पुनर्भरण कामाची पाहणी आणि पिकाची पाहणी केली. कन्नड नवोदय विद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुंजखेडा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम सहभाग घेऊन युवा संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी युवकांशी संवाद साधला.
कन्नड तहसीलदार कार्यालय येथे महसूल प्रशासनामध्ये राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नोंदणी कामाचा आढावा घेतला. आगामी काळामध्ये पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणी संरक्षित करण्याचे निर्देश संबंधित तहसिलदार यांना दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी ,नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.