पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीसमोरच २५ वर्षीय विवाहितेची साडी सोडण्याचा प्रयत्न करून तिचा हात धरून जवळ ओढत अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाविरुद्ध पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विहामांडवा (ता. पैठण) येथे मंगळवारी (६ ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली.
ज्ञानेश्वर आसाराम गाभूड (रा. विहामांडवा, ता. पैठण) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विहामांडवा येथील विवाहितेने तक्रार दिली आहे. मंगळवारी सकाळी पती-पत्नी त्यांच्या विहामांडवा गावाजवळील प्लॉटकडे कारने आले होते. रस्त्यात ज्ञानेश्वर गाभूड याने दगड ठेवला होता. तो विवाहितेच्या पतीने बाजूला केला असता शिवीगाळ करतच ज्ञानेश्वर गाभूड त्यांच्याकडे आला.
विवाहितेने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने कारची तोडफोड करत विवाहितेचा उजवा हात धरून तिला जवळ ओढले. तिच्या साडीचा पदर धरून साडी सोडण्याचा प्रयत्न केला. परत या ठिकाणी कार लावली तर जाळून टाकेन. तुम्हाला नवरा- बायकोला जीवे मारेन, अशी धमकी दिली. पोलिसांनी ज्ञानेश्वरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत.