छत्रपती संभाजीनगर/जालना (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाबद्दल उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी आतापर्यंत गोलमोल भूमिका घेतल्या आहेत. उलट त्यांनी सरकारकडे चेंडू टोलवत मराठा आणि ओबीसींची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढावा, असे म्हणत जबाबदारी ढकलली आहे. भाजप मात्र कुणावरही अन्याय होऊ न देण्याच्या मानसिकतेत आहे. १० टक्के आरक्षण मराठा समाजाला सरकारने दिले आहे. मात्र ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फुलंब्रीत पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडले. विरोधी पक्षांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांचे आंदोलन स्क्रिप्टेड असून मालकाकडून जशा सूचना येतात तसे ते करतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार उभे करणार नाहीत, असा आरोप केला. या आरोपाबद्दल जरांगे यांनी बोलायचे टाळले. मात्र पुन्हा सरकारवर शरसंधान साधले. सरकार आरक्षण देईल, याची आशा आम्ही सोडली आहे. तरीही २८ ऑगस्टपर्यंत वाट पाहू. निर्णय घेतला नाही तर २९ ऑगस्टला मराठा समाज निर्णय घेईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात चार सत्ताधारी आमदारांनी शनिवारी मनोज जरांगे पाटलांची आंतरवाली सराटीत भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे या आमदारांनी सांगितले. मला सरकारने पाठवले नव्हते, मी स्वतःच आलो, असा दावा त्यांनी केला. शनिवारी आमदार राऊत, तुळजापूरचे आमदार जगजितसिंह राणा पाटील, बदनापूरचे आमदार नारायण कुचे (तिन्ही भाजप) आणि नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर (शिंदे सेना) आंतरवाली सराटीत आले होते. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, ही आमची मागणी आहे. सरकारनेही ते मान्य केले होते. मात्र, त्यावर कार्यवाही होत नाही. सरकारकडून सगेसोयरेचा निर्णय व हैदराबाद गॅझेटही लागू केले जात नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, असे धनगर समाजाला आश्वासन दिले. तेही अपूर्ण आहे. आम्ही सर्व आशा सोडल्या आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे यांच्यात उमेदवार उभे करायची धमक नाही : वाघमारे
जरांगे यांच्या आंदोलनात पाच हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. याची राज्य आणि केंद्र सरकारने चौकशी केली तर अनेक बडे मासे पुढे येतील, असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला. जरांगे यांची विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची धमक नाही, असा टोलाही वाघमारे लगावला. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील उमेदवार जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. मात्र मालकाचा आदेश नसल्यामुळे त्यांनी तसे केले नाही. आता विधानसभेलाही त्यांनी उमेदवार देण्याचे म्हटले आहे, मात्र उमेदवार देण्याची त्यांच्यात धमक नसल्याने ते उमेदवार देणार नाहीत. त्यांना मालकाचा जो आदेश येईल त्याचप्रमाणे ते वागतात आणि बोलतात, असा आरोप वाघमारे यांनी केला.
शरद पवार, उद्धव ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका सांगावी : रावसाहेब दानवे
फुलंब्रीत पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास तयार आहोत. पण हे आरक्षण दुसऱ्यावर अन्याय करून द्यावे, अशी आमची भूमिका नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, सभापती अनुराधा चव्हाण, विजय औताडे, शिवाजीराव पाथ्रीकर, मंगलबाई वाहेगावकर, ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, जितेंद्र जैस्वाल आदींची उपस्थिती होती. बाजार समिती परिसरात आयोजित कार्यक्रमात दानवे यांच्या हस्ते शासनाच्या योजनेंतर्गत ३५० इमारत बांधकाम कामगारांना भांडेवाटप करण्यात आले. प्रास्ताविक अनुराधा चव्हाण यांनी केले. या वेळी मराठा नेते विनोद पाटील, जिल्हाध्यक्ष सिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारंग गाडेकर, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इलियास शहा, रोशन अवसरमल, विकास चव्हाण, संतोष तांदळे आदींची उपस्थिती होती.