छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाल्टा फाटा येथील येथील अंबिका लॉजवरील सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (४ जुलै) रात्री पर्दाफाश केला. यावेळी ४ युवतींची सुटका करण्यात आली. हॉटेल मॅनेजर आणि मालकाला अटक करण्यात आली. युवतींच्या आर्थिक अडचणी आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.
लॉज मॅनेजर सुभाष फकिरा राठोड (वय ४९, रा. अमराई, बजाज हॉस्पिटलमागे) व हॉटेल मालक विश्वास शिंदे (वय ५१, रा. झाल्टा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बीड बायपासवर हे अंबिका लॉज आहे. तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांना मिळाली होती. वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार सरला गाडेकर यांनी छाप्याचे नियोजन केले. त्यानुसार आधी बनावट ग्राहकाला लॉजवर पाठविण्यात आले.
बनावट ग्राहकाकडून १ हजार रुपये मॅनेजर राठोडने घेतले आणि १०६ क्रमांकाच्या खोलीत पाठवले. त्यानंतर एका युवतीला बनावट ग्राहकाच्या खोलीत पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी हल्लाबोल केला. लॉजची झडती घेतली असता अन्य खोल्यांमध्ये आणखी ३ युवती मिळून आल्या. चौघींचीही सुटका करण्यात आली. एकूण ५७,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात मोबाईल फोन, निरोधच्या पाकिटांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, विनोद भालेराव, अंमलदार दिलीप साळवे, कपिल बनकर, ईर्शाद पठाण, सपना चरवंडे, भाग्यश्री चव्हाण यांनी केली.