छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : काही दिवसांपूर्वी अव्वाच्या सव्वा बिल लावण्यावरून वादात सापडलेल्या एमजीएम रुग्णालयात आता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील आयसीयूत तोडफोड केली. ही घटना शनिवारी (५ जुलै) दुपारी घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
राबियाबी कुरेशी (वय ५१, रा. जालना) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्यांना इंडोस्कोपीसाठी नेले होते. तिथून आयसीयूत आणल्यानंतर अचानक कार्डियाक अरेस्ट आला, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (एआयनुसार, कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाची कार्यशक्ती अचानक थांबणे. यात हृदय अचानकपणे ठोके देणे बंद करते, त्यामुळे रक्त प्रवाह थांबतो आणि काही क्षणांतच मेंदू, फुफ्फुसे व इतर महत्त्वाचे अवयव ऑक्सिजनअभावी काम करणे बंद करतात.) डॉक्टरांनी राबियाबींना सीपीआर दिला, मात्र रुग्णाची प्राणज्योत मालवली. राबियाबींना नॉन-हॉजकिन लिंफोमासह (एनएचएल) डायबिटीज, ब्लडप्रेशर, किडनी फेल्युअर, न्यूमोनियाचे निदान झाले होते. डायलिसिसही सुरू होते.
डॉक्टरांचा हलगर्जीपणाचा आरोप
राबियाबींच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर नातेवाइकांनी हलगर्जीपणाचे आरोप केले. त्यांना व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने संताप वाढत गेला आणि त्यांनी खिडक्यांच्या काचा व रुग्णालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. नातेवाइकांचा आक्रमकपणा पाहून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात वृत्त लिहीपर्यंत पोलिसांत ना एमजीएमकडून नातेवाइकांविरुद्ध तक्रार होती, ना नातेवाइकांनी एमजीएमची तक्रार केली होती.