छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १९८० मध्ये थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून आमदारकीची उमेदवारी मिळवणारे आणि निवडूनही येणारे, पहिल्या युती सरकारसाठी अपक्षांची मोट बांधणारे माजी मंत्री अशोक राजाराम पाटील डोणगावकर (वय ८२) यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी (५ जुलै) सकाळी ११:५७ वाजता छत्रपती संभाजीनगरातील सहकारनगरातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (६ जुलै) सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी डोणगाव (ता. गंगापूर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या वतीने तिरंगा ध्वजात पार्थिव गुंडाळलेले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम, भाऊ आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष रमेश पाटील डोणगावकर, मुलगा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, मुलगी आमदार मोनिका राजीव राजळे, मुलगा राहुल डोणगावकर, मुलगी वैशाली सावंत आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंत्री अतुल सावे, खा. कल्याण काळे, माजी आमदार राजेंद्र दर्डा व राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांनी त्यांचे सहकारनगर येथील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. अशोक डोणगावकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४३ रोजी झाला. १९७८ ते १९८० या काळात ते डोणगावचे सरपंच राहिले. त्यानंतर तुर्काबाद जिल्हा परिषद गटाचे सदस्य असताना १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची विमानतळावर भेट घेत त्यांनी गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. इंदिरा गांधी यांनी त्यांना उमेदवारी दिलीही. त्यावेळी आमदार म्हणून निवडून आले. १९८० ते १९८५ ते काँग्रेसचे आमदार होते, तर १९९५ ते १९९९ या काळात अपक्ष आमदार होते. १९९५ मध्ये ते अपक्ष निवडून आले तेव्हा भाजप-शिवसेनेचे पहिले युती सरकार स्थापण्यासाठी अपक्ष आमदारांची गरज होती. डोणगावकर यांनी अपक्ष आमदारांची मोट बांधली. त्या काळात त्यांना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पद मिळाले. नागपूर-मुंबई महामार्ग, घृष्णेश्वर साखर कारखाना हे प्रकल्प सुरू करण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे.