छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील पॉलिटेक्निकच्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकट आले आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे हे विद्यार्थी असून, त्यांना अमानवीय वागणूक देण्यात आल्यानंतर आता चक्क कॅरिऑन किंवा वन टाइम ॲपोच्युर्निटी (ओटीओ) देण्यास नकार दिला जात असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत. अवघ्या ४ महिन्यांसाठी त्यांचे २ वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना साकडे घातले आहे. शिक्षण मंत्र्यांनाही ई-मेल केला आहे. मात्र अद्याप उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हटले आहे, की आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे २०२१-२०२२ चे विद्यार्थी असून, २०२४ मध्ये आम्हाला मिसिंग कोर्सेससाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आमच्यावर ३ विषय वाढविण्यात आले. या ३ विषयांसोबतच रेग्यूलर सेमिस्टरचे ९ विषयसुद्धा लावण्यात आले. त्यामुळे एकाच सत्रात १५ विषय देण्याची वेळ आमच्यावर आली. हे अत्यंत अव्यवहार्य व तणावपूर्ण होते. मिसिंग कोर्सेसचे लेक्चर्स व प्रॅक्टिकलही घेण्यात आले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तरीही त्या विषयांची परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शिकवले गेले नाही, तरी परीक्षेला बसवणे शैक्षणिक हक्कावर अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
पाचव्या सेमिस्टरचे ॲडमिशन फक्त ४ महिन्यांसाठी असून, ६ व्या सेमिस्टरमध्ये इंटर्नशीप आहे. म्हणजे केवळ ४ महिन्यांसाठी विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थी प्राचार्य आणि एमएसबीटीई कार्यालयात ही बाब मांडत आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याचे असंवेदनशील चित्र आहे. २०२१ व २०२२ च्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना तसेच मिसिंग कोर्ससाठी अर्ज केले होते त्यांना वन टाइम अपॉच्युर्निटी किंवा कॅरीऑन द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे दुर्लक्ष कसे?
छत्रपती संभाजीनगरातील या विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ई-मेल केले, कॉलही केले. मात्र अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्या ई-मेलची अद्याप दखलही घेतली गेलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. एरवी कायम विद्यार्थी हितासाठी पुढे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांची अवस्था लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे. यातून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.